शिवसेनेकडुन जिल्हाप्रमुखांवर कारवाई होणार: डॉ. संजय सावंत
जळगाव – मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राष्ट्रवादीकडुन पुरस्कृत झाल्याने त्यांच्यासह जे बंडखोर आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच असल्याची माहिती शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख डॉ. संजय सावंत यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली.
युती जाहीर असतांना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी बंडखोरी करून भाजपच्या अॅड. रोहिणी खडसे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने माघारीच्या अंतीम क्षणाला पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅड. रवींद्र पाटील यांची माघार करवुन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना पुरस्कृत करून खडसेंना घेरण्याची खेळी खेळली आहे. दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांवर कारवाई होईल असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, मुक्ताईनगरात जिल्हाप्रमुखांची बंडखोरी लक्षात घेता शिवसेनेकडुन योग्य ती कारवाई केली जाईल. ज्या-ज्या ठिकाणी बंडखोर आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच असल्याचे डॉ. संजय सावंत यांनी सांगितले.
भाजपानेही हिंमत दाखवावी
जिल्ह्यात पाचोरा, चोपडा, जळगाव ग्रामीण याठिकाणी भाजपाच्या पदाधिकार्यांनी बंडखोरी केली आहे. या जिल्ह्यात भाजपाचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन हे आहेत. ते असतांना बंडखोरी झाली. यासंदर्भात त्यांच्याशी आपण स्वत: चर्चा करणार असुन भाजपानेही अशा बंडखोरांवर कारवाई करण्याची हिंम्मत दाखवावी असे डॉ. सावंत यांनी सांगितले.