शिवसेनेत डावलले गेले – ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांचा गौप्यस्फोट
जळगाव – शब्द देऊनही कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पदापासून दूर ठेवण्यात आले. गेली तीन वर्षे जिल्ह्यात संघटन बांधणीचे काम करूनही सातत्याने अन्याय करण्यात आला. एका गटाच्या सांगण्यावरून गुलाबराव पाटलांनी संचालक पदाची माझी नियुक्ती थांबविल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हा संघटक हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. दरम्यान गुलाबराव पाटलांना कंटाळून आपण जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी सभापती लक्ष्मण पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील हे उपस्थित होते. हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी माहिती देतांना सांगितले की, हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा नेतृत्वाखाली शिवसेनेचा झेंडा घेत गेल्या तीन वर्षापासून मी जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सांभाळत आहे. दरम्यानच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मला उमेदवारीत डावलण्यात आले. त्यानंतर संभाआबा पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संचालक पदी माजी आ. सुरेशदादा यांनी माझे नाव सुचविले होते. त्यावेळी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही होकार दिला. बाजार समितीत लक्ष्मण पाटील उर्फ लकीआण्णा सभापती असतांना पहिल्याच सभेत माझ्या नियुक्तीचा विषय अजेंड्यावर घेतला. मात्र एका गटाच्या सांगण्यावरून राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी माझी नियुक्ती थांबविली. त्यावेळी मी राष्ट्रीय किर्तन सोहळ्यासाठी नेपाळ येथे गेल्यानंतर या रिक्त जागी मला डावलुन पंकज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सातत्याने माझ्यावर गुलाबराव पाटलांनी अन्याय केला. मी जळगाव ग्रामीणचा मतदार असल्याने या मतदारसंघातील निवडणूक कामकाजासंदर्भात नेतृत्वाकडुन मला कुठल्याही प्रक्रियेत सहभागी करून घेतले नसल्याचा आरोप जळकेकर महाराज यांनी केला. त्यामुळे गुलाबराव पाटलांकडुन होणार्या अन्यायाला कंटाळून आज जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देत असल्याचा गौप्यस्फोटही ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी केला.
तुर्तास अत्तरदेंना पाठींबा
हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपाचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना पाठींबा जाहीर केला आहे.
गुलाबरावांविरूध्द नाराजांची एकजूट
जळगाव ग्रामीणमधील शिवेसेनेचे उमेदवार तथा राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याविरूध्द त्यांच्याच पक्षातील नाराजांची एकजूट होत आहे. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, आणि आता हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांचा समावेश आहे. या एकजूटीमुळे गुलाबराव पाटील यांनी अडचण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.