ना. गुलाबरावांचा नागरीकांनी अडवला रस्ता

0

जैनाबाद वासियांनी वीजेबाबत विचारला जाब

जळगाव – शहरातील जैनाबाद परिसरातील नागरीकांनी आज सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा रस्ता अडविला. त्यांना घेराव घालून वीजप्रश्‍नी जाब विचारला. यावेळी नागरीकांच्या संतापामुळे ना. गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या समवेत असलेल्या पदाधिकार्‍यांची धांदल उडाली.
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात, तसेच अधिकार्‍यांचा निषेध म्हणून वाल्मिक नगरातील बंद पडलेल्या डीपीची दोन दिवसापूर्वी पंचारती करत महावितरणचा निषेध करण्यात आला होता. यावेळी बंद पडलेली डीपी सुरु न केल्यास, नाईलाजास्तव नागरिकांनी आकोडे टाकत आपली विजेची गरज भागवत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आकोडे खाली लोंबकळत आहे. या लोंबकळणार्‍या आकोड्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यास अधिकार्‍यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला होता. आज या मार्गाने जात असलेले सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची गाडी अडवुन नागरीकांनी त्यांना घेराव घातला.

नागरीकांचा इशारा

यावेळी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. विजेची थकबाकी माफ करून, नवीन वीज मीटर बसवून बंद असलेली डीपी सुरु करावी, तसेच वाल्मिक नगर आकोडे मुक्त करावा अशी मागणी करीत नागरीकांना ना. पाटील यांना जाब विचारला. या प्रकारामुळे ना. पाटील यांच्यासमवेत असलेल्या पदाधिकार्‍यांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान सात दिवसाच्या आत डीपी बसवली गेली नाही तर, वाल्मिक नगरातील रहिवाशांच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ना. पाटील यांना देण्यात आला.