मुंबई-पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला सिद्धूने घरचेच लग्नकार्य असावे अशा थाटात मिरवला. सिद्धूच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटत असती तर त्याने पाकड्यांच्या प्रदेशात जाऊन तेथील लष्करप्रमुखांना मिठ्या मारण्याचा मूर्खपणा केला नसता, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सिद्धूंवर टीका केली आहे. पाकचे लष्करप्रमुखा कमर वाजवा यांची गळाभेट घेण्यावरुन पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूंवर सर्वत्र टीका होत आहे. शिवसेनेने देखील सिद्धूंवर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या १५ दिवसांत सीमेवर पाकच्या गोळीबारात मेजर कौस्तुभ राणेसह १५ जवान शहीद झाले असतानाच सिद्धू पाकिस्तानात जाऊन अशा प्रकारे गळाभेट घेतो, ही बाब निर्लज्जपणाची असून सिद्धूला पाकिस्तानबद्दल इतकं प्रेम असेल तर त्याने पाकिस्तानातूनच निवडणूक लढवावी, असे शिवसेनेने म्हटले आहे.