मेळावा उधळण्याचा प्रयत्न – भाजपा पदाधिकार्यांचा आरोप
जळगाव – जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे पाळधी येथे आज तालुका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा होण्यापुर्वीच काल मध्यरात्री शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांनी मद्यधुंद अवस्थेत मेळावस्थळी धुडगूस घालुन खुर्च्यांची मोडतोड आणि लाईट फोडल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांनी केला आहे. दरम्यान ना. गुलाबरावांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला हा धुडगूस लक्षात घेता भाजपाचे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले असुन त्यांनी युती झाल्यास या मतदारसंघात शिवसेनेचे काम न करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यस्तरावर युतीच्या चर्चा सुरू असल्या तरी जिल्ह्यात मात्र भाजपा आणि शिवसेनेत नेहमीच शितयुध्द सुरू राहीले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली. भाजपातर्फे जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता. गुरूकृपा लॉन येथे आयोजीत मेळाव्यासाठी कालपासून जय्यत तयारी करण्यात आली होती. जळगाव ग्रामीण मतदारसंघातुन भाजपातर्फे लक्ष्मण गंगाराम पाटील व चंद्रशेखर अत्तरदे हे दोन उमेदवार इच्छुक आहेत. युती न झाल्यास या दोघांपैकी एका उमेदवाराला या मतदारसंघातुन संधी मिळणार आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याठिकाणी माजी जि.प.सदस्य पी.सी.पाटील यांनी देखिल मोठी ताकद उभी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपा विरूध्द सेना असा संघर्ष नेहमीच बघायला मिळतो. मेळाव्याच्या एक दिवस आधी म्हणजेच काल दि. २२ रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांनी मद्यधुंद अवस्थेत खुर्च्यांची मोडतोड करीत, लाईट फोडले. तसेच स्वयंपाकींना मारहाण व शिवीगाळ देखिल केल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांनी दिली. दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भाजपाचा मेळावा उधळुन लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
वरीष्ठांकडे तक्रार
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीची तक्रार प्रदेश संघटनमंत्री, भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती पी.सी.पाटील यांनी दिली. तसेच यासंदर्भात पोलीस ठाण्यात देखिल गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.