मुंबई – शिवसेना-भाजप मधील वाद विकोपाला गेला असल्याची स्थिती असतानाच सेनेने आगामी मे-जूनच्या दरम्यान विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. शिवसेना या सहाही जागा स्वबळाबर लढणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्या संदर्भातील बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेना भवन येथे पार पडली. शिवसेनेने या बैठकीमध्ये २ उमेदवार निश्चित केले असून, उर्वरित चार उमेदवार लवकरच शिवसेना निश्चित करणार आहे. निश्चित केलेल्या दोन उमेदवारांमध्ये नाशिक मतदार संघातून नरेंद्र दराडे आणि कोकण मतदार संघातून राजीव साबळे यांना उमेदवारी निश्चित केल्याची माहिती मिळाली आहे.
चुरस निर्माण
शिवसेनेकडून नाशिक विधानपरिषदेसाठी नरेंद्र दराडे आणि कोकणातून राजीव साबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत ६४५ मते असून, त्यापैकी शिवसेनेकडे २११ तर भाजपकडे १८० मते आहेत. कोकण मतदार संघातील स्थानिक मतदार संघात शिवसेना २४७, भाजप १३५, राष्ट्रवादी १५५ आणि काँग्रेसकडे १३३ मते असल्याने कोकण मतदार संघात चुरस निर्माण झाली आहे.
दरम्यान, याच वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पदवीधर, ठाणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा आढावा घेतला असून, लवकरच उमेदवार निश्चिती केली जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून निश्चित केलेल्या उमेदवारांपैकी नरेंद्र दराडे हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आहेत, तर राजीव साबळे हे माजी आमदार अशोक साबळे यांचे पुत्र असून, ते स्वतः माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.