केजरीवाल यांना शिवसेनेचा पाठिंबा

0

नवी दिल्ली-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नायब राज्यपालांच्या निवासस्थानातील ठिय्या सोमवारी आठव्या दिवशीही कायम आहे. गेल्या सोमवारपासून केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान, केजरीवालांच्या आंदोलनाला आता भाजपाचा सहकारी पक्ष शिवसेनेची साथ मिळताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः अरविंद केजरीवाल यांना फोन केला होता, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

लोकशाही व्यवस्थेत निवडून दिलेल्या सरकारला संपूर्ण अधिकार असायला हवा अन्यथा लोकशाहीचा काही अर्थ राहत नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केजरीवाल यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केजरीवालांच्या आंदोलनाला समर्थन दिलंय. आता यामध्ये शिवसेनेचीही भर पडली आहे. आयएएस अधिकाऱ्यांचा अघोषित संप मिटवा, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा आणि गरीबांच्या घरी रेशन पोहोचवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी या केजरीवालांच्या मागण्या आहेत.

पंतप्रधानांच्या घरी रेशनची पाकिटे
‘आप ‘चे नेते आणि आमदारांनी आंदोलन अधिक तीव्र केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी रेशनची पाकिटे पाठवली आहेत. आता सोमवारपासून घरोघरी जाऊन ‘आप’च्या आंदोलनाची माहिती दिली जाईल आणि १० लाख स्वाक्षरींची मोहीम सुरू केली जाणार असल्याचे ‘आप’ने जाहीर केले आहे.