शिवसनेची भाजपावर कुरघोडी, विश्वजीत कदमांना पाठींबा

0
पलूस-कडेगावची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा 
मुंबई – ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत कदम यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा देत भारतीय जनता पार्टीवर कुरघोडी केली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी यांनी गुरूवारी एका पत्रकाद्वारे याची घोषणा केली.
 पतंगराव सहकार, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील एक कर्तबगार व दिलखुलास नेते होते. राजकारण व सहकारात त्यांची भूमिका पक्षापलीकडली होती. हे सर्व पाहता पतंगरावांना श्रद्धांजली म्हणून पलूस-कडेगावची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती. तसे दुर्दैवाने होताना दिसत नाही. मात्र, आम्ही विश्वजीत कदम यांना संपूर्ण तसेच सक्रीय पाठिंबा जाहीर करत आहोत, अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
पलूस-कडेगाव विधानसभा क्षेत्रात विश्वजीत कदम काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्त उमेदवार ाहेत. येथे भाजपाने संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेना बाजपाला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा जाणकार वर्तवित होते. मात्र, शिवसेनेने भाजपाविरूद्ध उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून भाजपावर कुरघोडी केली असल्याचे दिसून येते.