मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. बहुमत नसल्याने आणि शिवसेनेने पाठींबा न दिल्याने भाजपाने सत्तास्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिले आहे. दरम्यान आता शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतली आहे. एनडीएमधून शिवसेना बाहेर पडणार आहे. केंद्रातील एकमेव मंत्रीपदाचा राजीनामा अरविंद सावंत यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे. आता राजीनामा देण्यासाठीची ते प्रक्रिया पूर्ण करत आहे. दिल्लीत त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे.
लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? असा संताप व्यक्त करत त्यांनी राजीनाम देणार असल्याचे सांगितले आहे.