शोभा डे म्हणतात राज्यपाल चमचा असतो

0

बंगळूर-आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या लेखिका शोभा डे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेल्या राजकीय पेचप्रसंगात राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. नेमके यावरच त्यांनी भाष्य करून खळबळ उडवून दिली आहे. लोकशाहीत इतका महत्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शोभा डेंच्या या ट्विटमुळे त्या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.

कर्नाटकात १०४ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस (७४) आणि जेडीएस (३७) या दोघांनी आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप कोणालाच सत्ता स्थापण्याचा निर्णय दिलेला नाही. त्यामुळे ही राजकीय कोंडी सुटणार की आणखी तिढा निर्माण होणार याचीच सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

शोभा डेंनी दुसरे ट्विट करत कर्नाटकात किती घोडे खरेदी केले आणि विकले, असा खोचक सवाल करत कृपया, मला त्यांचे फोन नंबर आणि नावे सांगा, अशी विनंती त्यांनी केली. ट्विटर युजर्सनी त्यांच्या या ट्विटचीही खिल्ली उडवली आहे.