मुंबई- शॉपमॅटिक या आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनीने भारतातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक स्तरावर एक आगळावेगळा नवीन उपक्रम सादर केला आहे. आपल्या ग्राहक विक्रेत्यांना ऑनलाईन पद्धतीने उत्पादनांची विक्री करता यावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा लीलया वापर करणाऱ्या या ब्रॅण्डच्या नव्या “प्रोत्साहक उद्योजकता उपक्रमां’’तर्गत देण्यात येणाऱ्या सेवा तीन महिन्यांसाठी लागू होणार असून, केवळ १ अमेरिकन डॉलर दरमहा खर्च करून याचा लाभ घेता येणार आहे.
देशभरातल्या विक्रेत्यांना आता आपले स्वतःचे प्रतिसादात्मक ऑनलाईन दालन उभारण्यासाठी या ब्रॅण्डच्या आधुनिक तंत्रज्ञानात्मक टूल्सचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. याद्वारे, विक्रेत्यांना आपल्या मालाचे व्यवस्थापन करण्यात, ऑर्डर्स मिळवण्यात तसेच, ग्राहकांकडून पेमेंट्स मिळवण्यातही मदत होणार आहे.
शॉपमॅटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अनुराग अवूला म्हणाले, “अफाट कल्पनाशक्ती असलेले अनेक उदयोन्मुख उद्योजक भारताच्या कानाकोपऱ्यात दडलेले असून आपली उत्पादने ऑनलाईन विकण्याची त्यांच्यामध्ये इच्छाही आहे. उद्योन्मुख व्यापाऱ्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या तांत्रिक व तंत्रज्ञानविषयक अडथळ्यांचे आम्ही या व्यासपिठावर उच्चाटन केले असून या प्रोत्साहक उद्योजकता उपक्रमाच्या माध्यमातून, ऑनलाईन ई-कॉमर्सच्या प्रवासातील नवीन उद्योजकांच्या सर्व अडचणी आम्ही दूर केल्या आहेत.
विक्रेत्यांना आपला यशस्वी ऑनलाईन व्यापार सुरू करून तो चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स आम्ही शॉपमॅटिक प्रो सबस्क्रीब्शनच्या माध्यमातून पुरवत आहोत. यात स्टोअर क्रिएशन, डेटा अनालिटिक्स, लॉजिस्टीक्स, पेमेंट गेटवे या सुविधा उपलब्ध आहेत. केवळ १ डॉलर प्रति महिना इतकी नगण्य गुंतवणूक करून, व्यवसाय करण्याची इच्छा बाळगणारी भारतातील कुणीही व्यक्ती या सेवांचा लाभ घेऊ शकते. या व्यासपिठाच्या मदतीने, गृहिणी, एसएमई, विद्यार्थी, बेकर्स, कलाकार, छायाचित्रकार, सेवा पुरवठादार, डिझायनर्स, कारागीर यांच्यातून व्यापक प्रमाणात नवीन उद्योजक तयार होतील, अशी आम्हाला आशा आहे.