नवी दिल्ली:श्रीलंकेत झालेल्या हल्ल्यानंतर आता बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आता भारतात बुरखा बंदीची मागणी होत आहे. दरम्यान आता बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे, अशी भूमिका प्रसिद्ध गीतकार आणि पुरोगामी विचारवंत जावेद अख्तर यांनी मांडली आहे. बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून, केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या ६ मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, अशी मागणी मी केली होती, मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण अख्तर यांनी दिले आहे. जावेद अख्तर यांनी आज शुक्रवारी पहाटे ट्विट करत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले.
बुरख्याबाबत माझे ज्ञान खूपच कमी आहे. याचे कारणही आहे. ज्या घरात मी राहिलो त्या घरातील सर्व महिला या कामावर जाणाऱ्या होत्या. मी कधीही माझ्या घरात बुरखा पाहिलेला नाही, असे अख्तर म्हणाले. इराक हा मोठा कट्टर देश आहे. मात्र, तिथे महिला आपला चेहरा झाकत नाहीत. श्रीलंकेत जो कायदा आला आहे, त्या नुसार तुम्ही तुमचा चेहरा झाकू शकत नाही. बुरखा वापरा, मात्र चेहरा झाकलेला असता कामा नये. हे त्यांनी कायद्यात अंतर्भूत केले, असेही अख्तर पुढे म्हणाले.