नवी दिल्ली: काल ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबोत साखळी बॉम्बस्फोट झाला. यात २९० पेक्षा अधिक जण ठार झाले आहेत. दरम्यान घटनेनंतर श्रीलंकेत पर्यटनासाठी गेलेले जनता दल युनायटेड या भारतातील राजकीय पक्षाचे ७ सदस्य बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत ट्विट केले आहे.
कोलंबोतील स्फोटांनंतर जेडीएसचे ७ सदस्य बेपत्ता असल्याचे मला कळले आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतेच स्पष्ट केल्याने मला धक्काच बसला आहे. हे दोघेही माझ्या चांगल्या परिचयाचे होते. या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात दोन कन्नड नागरिकांचा मृत्यू झाला असून के. जी. हनुमनथरयाप्पा आणि एम. रंगप्पा अशी या दोघांची नावे आहेत, हे दोघेही जेडीएसचे सदस्य आहेत. कोलंबोतील तीन चर्च आणि तीन हॉटेल्समध्ये झालेल्या या आठ साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९०वर पोहोचला असून यात ५ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये ५०० हून अधिक लोक जखमी झाले असून एकूण ४० परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.