कोलंबो: जगभरात आज ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरांमध्ये एकापाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ ८ स्फोट झाले आहेत. या स्फोटांमध्ये मृत्यूचा आकडा १९० च्या जवळ पोहचला आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर जखमींची संख्या ४०० च्यावर पोहोचली आहे. सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली घडली.
कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये अनेक निरापराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार बट्टीकलोआ, कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये स्फोट झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया देत ‘कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे’ असे ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.