श्रीलंकेतील बॉम्बस्फोटप्रकरणाची पाळेमुळे भारतापर्यंत; केरळमधील तीन तरुणांना अटक !

0

तिरुवनंतपुरम: आजच्या आठवड्याभरापूर्वी रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबोत साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. यात ३५० पेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. या हल्ल्याची पाळेमुळे आता भारतापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी भारतीय तपास यंत्रणेने तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. यापैकी दोन तरुणांना केरळमधील कासरगोड येथून तर एका तरुणाला पलक्कड येथून अटक करण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांचा श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार जहरान हाशीमसोबत थेट संपर्क होता. दरम्यान, या तरुणांची एनआयएच्या मुख्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. गेल्या रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आठ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. श्रीलंकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला होता.

दरम्यान, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनंतर तपास यंत्रणांना केरळमधील आयएस मॉड्युलवर संशय होता. तसेच आयएसबाबत सहानुभूती असणाऱ्यांना तपास यंत्रणांनी याआधीही ताब्यात घेऊन सोडले होते. मात्र या हल्ल्यानंतर या सर्वांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. तसेच श्रीलंकेमधील हल्ल्याचा मास्टरमाईंड जहरा हाशीम हा केरळ आणि तामिळनाडूमधील आयएसच्या कॅडरसोबत गेल्या तीन वर्षांपासून सोशल मीडियावरून संपर्कात होता.