आजारी बसेस, नियोजनाचा अभाव. शिंदखेडा आगाराच्या गाड्या नको रे बाबा.
शिंदखेडा.
येथील एस टी महामंडळाच्या आगाराला नियोजनाचा अभाव आणि नादुरुस्त बसेसचा उत्पन्नावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. वेळापत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याने या आगाराच्या गाड्या बेभरवशाचा असतात अशा प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिंदखेडा आगारातून सुटणार्या बहुतांश बसेस या वेळेत लागत नाही त्यामुळे या बसेसची वाट न पाहता प्रवाशी अन्य खाजगी वाहनांचा वापर करीत आहेत. तथापि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांना मात्र या बस सेवेशिवाय अन्य पर्याय नाहीत. नाईलाजाने त्यांना ताटकळत बसावे लागते.
शिंदखेडा येथून धुळे, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, शिरपूर येथे जाण्यासाठी खूप प्रवाशी असतात. या ठिकाणी जाण्यासाठी अन्य आगाराच्या गाड्या अथवा खाजगी वाहनांचा वापर करणे पसंत केले जाते. धुळे आणि शिरपूर येथील गाड्या पुर्णपणे बेभरवशाच्या असतात. कधी कधी दोन तीन तासांपर्यंत गाडी नसते तर कधी कधी एकाच वेळी तीन चार गाड्या लागतात. धुळे आगारातून चौकशी केली असता समाधानकारक उत्तर दिले जात नाहीत.
या पार्श्वभूमीवर आगार व्यवस्थापकांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.