“पंतप्रधान मोदींसारखे देवदुर्लभ नेतृत्व आपल्याला लाभल्यामुळे…”
भाजपा स्थापना दिवस कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
आपण सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सत्ता आपल्यासाठी एक साधन आहे. ज्याचा उपयोग करुन सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करायचं आहे. सामाजिक, आर्थिक लढाईतील एक परिवर्तन म्हणून आपण सत्तेकडे पाहतो, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
“महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात गरिबांसाठी दहा लाख घरांची तरतूद आपण केली आहे. शेतकऱ्यांना १ रुपयांत विमा देत आहोत. सामान्य माणसाला ५ लाखापर्यंत मोफत आरोग्यसेवा देण्याचं आपल्या सरकारने ठरवले आहे. म्हणून समाजात मोठे परिवर्तन करण्याचं काम आपण करत आहोत,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
“आज भाजपा देशातील सर्व भागात जनतेचा पक्ष म्हणून काम करताना पाहायला मिळतोय. ईशान्य भारतात भाजपाची सरकार स्थापन झाली आहेत. समाजातील सर्व स्तरातील लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. हा विश्वास तयार झाला आहे, कारण गेली ९ वर्षे एक नेता घर संसार सोडून २४ तास भारताचा विचार करतो. करोनासारख्या महामारीत जगात लोक भुकेने मरत होती. पण, भारतात एकाही व्यक्तीला भुकेने मरू दिले नाही. सर्वांपर्यंत अन्न पोहचवणारे पंतप्रधान मोदी होते,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
“जगाच्या पाठीवर ४ ते ५ देश आहेत, ज्यांना करोनाची लस तयार करता आली. आपल्या देशात लस तयार झाली असून, १३५ कोटी भारतीयांना ती मोफत देत, त्यांना जगवण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केले. भाजपा हा जनसामान्यांचा पक्ष आहे. पंतप्रधान मोदींसारखे देवदुर्लभ नेतृत्व आपल्याला लाभल्यामुळे येत्या काळात आपल्याला अजून, पुढे जायचे आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.