मुंबई । शुक्रतारा मंदवारा या गीताने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा गोड आवाज आज कायमचा बंद झाला. ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते 84 वर्षांचे होते. पहाटे सहा वाजता त्यांनी मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी 2 वाजता मुंबईतील सायन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’…‘येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’…‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’….‘दिवस तुझे हे फुलायचे’…‘अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी’…आणि ’या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’..,अशा त्यांच्या हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांनी दोन पिढ्यांवर अधिराज्य गाजवले.
1962 ला पहिली ध्वनिमुद्रिका
अरुण दाते यांचा जन्म 4 मे 1934 रोजी झाला होता. त्यांचे वडील रामूभय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायनाकडे वळले. इंदूरजवळील धारमध्ये कुमार गंधर्वांकडे ते सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत यांनी सजलेल्या ’शुक्रतारा मंदवारा’ या गाण्यातून अरुण दाते खर्या अर्थाने नावारूपास आले. 1962मध्ये त्यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली होती. पुढे दाते आपल्या कार्यक्रमांमध्येही ‘शुक्रतारा’ गाऊ लागले.
त्यांनी अनेक द्वंद्वगीतेही गायली
त्यांचे उर्दू आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक अल्बमही लोकप्रिय झाले आहेत. ‘शतदा प्रेम करावे’ या नावे लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र 1986 मध्ये प्रसिद्ध झाले होते. 2016 मध्ये हे पुस्तक पुनर्प्रकाशित करण्यात आले. दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत अनेक द्वंद्वगीते गायली आहेत. अरुण दाते यांच्या आवाजात असंख्य भावगीते स्वरबद्ध झाली आहेत. 1955 पासून त्यांनी आकाशवाणीवर गाण्यास सुरुवात केली. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केले.
दाते यांच्या निधनाने मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजाने सजलेली अनेक गाणी अजरामर झाली.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.