नवी दिल्ली- बॉलीवूडमधील एका पाठोपाठ एक लैंगिक शोषणाचे आरोप समोर येत आहे. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादानंतर कदाचित बॉलिवूडमध्येही # meeto मोहिम सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक महिलांनी त्यांच्यासोबतच्या लैंगिक शोषणाच्या, गैरवर्तनाच्या घटना सांगितली आहे. दिग्दर्शक विकास बहल. टीमच्या एका महिलेने विकास बहलवर गंभीर आरोप केल्यानंतर बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत हिनेही या महिलेची पाठराखण करत, विकास बहलवर गंभीर आरोप केले आहेत. आता एका महिला फोटो जर्नालिस्टने कैलाश खैरवर अशाच प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. आपल्या अन्य एका महिला साथीदारासोबत ही महिला फोटोग्राफर कैलाश खैरची मुलाखत घ्यायला गेली होती, तेव्हाची ही घटना असल्याचा दावा केला गेला आहे. आपल्या या वाईट अनुभवाबद्दल या महिला फोटोग्राफरने ट्विट केले आहे.
‘कैलाश खैर आम्ही दोघींच्यामध्ये बसला होता आणि मुलाखत देताना सतत त्याचा हात आमच्या मांडीवर होता. कैलाशच्या मुलाखतीत या घटनेचाही उल्लेख कर, असे मी माझ्या जर्नलिस्ट मैत्रिणीला म्हटले होते. पण वृत्तपत्र या अँगलची बातमी छापणार नाही, असे तिचे म्हणणे होते, असे या पीडित महिला फोटो जर्नलिस्टने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे. कैलाश खैरशिवाय या फोटो जर्नलिस्टने मॉडल जुल्फी सैय्यद याच्यावरही काहीसे असेच आरोप केले आहे, क्रूज लाईनरवर मी माझ्या काही पत्रकार मित्रांसोबत गेले होते, यावेळी मी माझा फोन चार्जिंगला लावायला जुल्फीच्या रूममध्ये गेले असता, त्याने मला बळजबरीने किस करणे सुरू केले. याची तक्रार करायला हवी, असे मी सोबतच्या जर्नलिस्टला म्हटले. पण तुझे हे आरोप कुणीच छापणार नाही, असे मला सांगण्यात आले. अर्थात दुसऱ्या दिवशी जुल्फीने झालेल्या कृत्यासाठी माझी माफी मागितली, असे तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.