मुंबई – ‘या जन्मावर या जगण्यावर’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ अशा अजरामर गीतांनी मराठी श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले ज्येष्ठ संगीतकार-गीतकार यशवंत देव यांचे 92व्या वर्षी निधन झाले. यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. वडिलांकडून देव यांना तालाचे बाळकडू मिळाले. जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
अस्सल कलावंत हरपला-मुख्यमंत्री
ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांच्या निधनाने शब्दांसोबतच सुरांवर प्रभुत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समृद्ध करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात अनेक भावगीतांसह देव यांनी नाटकांना दिलेले संगीतही कायम स्मरणात राहील. एक अष्टपैलू संगीतकार म्हणून यश मिळवण्यासोबतच त्यांनी लिहिलेली अनेक गीतेही लोकांच्या ओठावर सहज येतात. नव्या पिढीच्या आवडींशी नाळ जोडतानाच संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे असे म्हटले आहे.
एक प्रयोगशील ज्येष्ठ कलावंत काळाच्या पडद्याआड: विखे पाटील
कवी, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांच्या निधनाने मराठी संगीत क्षेत्रात अधिराज्य गाजविणारे एक प्रयोगशील ज्येष्ठ कलावंत काळाच्या पडद्याआड गेले, या शब्दात विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. देव यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, वडिलांकडून संगीताचा वारसा लाभलेल्या यशवंत देवांनी आपले सर्वस्व या क्षेत्रासाठी समर्पित केले होते.
आपल्या सिद्धहस्त लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या गीत रचना संगीत दिग्दर्शक या नात्याने मराठी रसिकांसमोर आणून अजरामर केल्या. यशवंत देवांनी लोकगितांची परंपरा जोपासतानाच कलाकार घडविण्यासाठी कार्यशाळा घेण्याची संकल्पना सुरू ठेवून संगीत क्षेत्रासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे सांगून विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.