अफगाणिस्तानात 6 भारतीय अभियंत्यांचे अपहरण

0

तालिबानवर शंका : जोरदार शोधमोहीम सुरु
अपहृत अभियंते वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचारी
बंदुकीच्या धाकावर बस रोखून अभियंत्यांना पळविले

काबूल : अफगाणिस्तानातील उत्तरी बघलान राज्यात वीजनिर्मिती केंद्रात कार्यरत असलेल्या सहा भारतीय अभियंत्यांसह एका अफगाणिस्तानी वाहनचालकाचे अपहरण झाल्याची थरारक घटना रविवारी घडली. अज्ञात बंदुकधार्‍यांनी बंदुकीच्या धाकावर अभियंत्यांना वीजकेंद्राकडे घेऊन जाणारी मिनीबस रोखली. त्यातील बसचालकासह सर्व अभियंत्यांना हे बंदूकधारी अज्ञातस्थळी घेऊन गेले, अशी माहिती बघलान पोलिसदलाचे प्रवक्ते झबीउल्लाह शुजा यांनी प्रसारमाध्यमांशी दिली. हे सर्व अभियंते सरकारी नियंत्रणातील दा अफगाणिस्तान ब्रेश्‍ना शेरकत (डीएबीएस) या वीजनिर्मिती केंद्राची कंत्राटदार भारतीय कंपनी केईसीकरिता कार्यरत होते. या घटनेनंतर भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अफगाणिस्तानशी संपर्क साधून काळजी व्यक्त केली. पोलिसांसह गुप्तचर यंत्रणेने तातडीने शोधमोहीम हाती घेतली होती. तालिबानने या अभियंत्याचे अपहरण केले असावे, अशी शक्यता वर्तविली जात असून, भारताच्या काळजीत भर पडली आहे. अभियंत्याच्या सुटकेसाठी भारताकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत होते.

अपहरणावर तालिबानचे मात्र मौन!
स्थानिक वृत्तवाहिनी टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सहा भारतीयांसह एक अफगाणिस्तानी चालकाच्या अपहरणाची घटना बाग-ए-शामल गावानजीक घडली. या गावाजवळ भारतीय कंपनी केईसीला वीजनिर्मितीचे उपकेंद्र स्थापन करण्याचे कंत्राट मिळाले होते. त्याची पाहणी करण्यासाठी हे अभियंते मिनी बसमधून जात होते. बघलान राज्य पोलिसांनी या अपहरणामागे तालिबानचा हात असल्याची शंका व्यक्त केली असून, जोरदार शोधमोहीम हाती घेतली होती. तथापि, या अपहरणाबाबत तालिबानने मात्र मौन बाळगले आहे. अफगाणमधील भारतीय दूतावासाच्या अधिकार्‍यांनी सांगितले, की आम्हाला भारतीयांच्या अपहरणाची माहिती मिळाली आहे. आम्ही अफगाण अधिकार्‍यांच्या संपर्कात असून, अपहृतांचा शोध घेत आहोत. ज्या अज्ञात अपहरणकर्त्यांनी बंदुकीच्या धाकावर हे अपहरणनाट्य घडविले त्यांची माहिती गोेळा करण्याचे कामही सुरु करण्यात आले होते. अफगाणमधील अनेक नवनिर्माणाधीन प्रकल्पांवर भारतातून आलेले तब्बल 150 अभियंते काम करत असून, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अफगाणिस्तान सरकारची आहे. या अपहरणामुळे या अभियंत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या देशात स्थानिक नागरिकांचे अपहरण होणे ही सामान्य बाब असून, वाढती बेरोजगारी त्याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी 2016 मध्ये एका भारतीयाचे अपहरण करण्यात आले होते. 40 दिवसानंतर त्याची सुटका करण्यात आली होती.

अपहृत अभियंते भारतीय कंपनी केईसीचे कर्मचारी
अपहृत भारतीय केईसी इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीकरिता काम करत होते. ही कंपनी अफगाणिस्तानात 226 कोटी रुपये गुंतवून वीजनिर्मितीचे उपकेंद्र उभारत आहे. या केंद्रामुळे अफगाणिस्तानातील वीजेची समस्या सुटणार आहे. भारतीय अभियंत्यांच्या अपहरणाची जबाबदारी अद्याप कुण्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. तथापि, तालिबानवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. उत्तर भागात ही घटना घडल्याने व हा भाग अद्यापही तालिबान प्रभावित असल्याने स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेबाबत भारतीय दूतावासाचे अधिकारी अफगाणच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात असून, शोधमोहिमेची माहिती घेत आहे.