पठाणकोट: जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कारकरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरून संपूर्ण देशात संतापाचे वातावरण पसरले होते. या निंदनीय घटनेप्रकरणी पठाणकोट कोर्टाने मुख्य आरोपी सांझी राम, तिलक दत्ता यांच्यासह सहा जण दोषी ठरवले आहेत. तर, आरोपी विशाल याला दोषमुक्त करण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने आज सोमारी आपला निकाल सुनावला. या प्रकरणात सातजणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. तर, एक आरोपी अल्पवयीन असून त्याच्याविरोधात अद्याप खटला सुरू झाला नाही.
कठुआ प्रकरणामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आवारात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. या प्रकरणी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानुसार गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार आणि नंतर तिचा खून करण्यात आला असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात गेल्या वर्षी जून महिन्यापासून या प्रकरणावर दररोज सुनावणी झाली. गुन्हे शाखेने या प्रकरणात गावाचे प्रमुख सांजी राम, त्यांचा मुलगा विशाल, अल्पवयीन भाचा, विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंदर वर्मा यांना अटक करण्यात आली होती. हेड कॉन्स्टेबल टिळक राज आणि उपनिरीक्षक आनंद दत्ता यांनाही अटक करण्यात आली होती. बलात्कार आणि खून प्रकरणाचा आरोप आठपैकी सात आरोपींवर ठेवण्यात आला होता. एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्याविरोधात खटला सुरू करण्यात आला नाही. या आरोपीच्या वयाबाबत जम्मू-काश्मीर हायकोर्ट निकाल देणार आहे.