अमरावती – चांदूर रेल्वे परिसरात शेजारी-शेजारी राहणाऱ्या २ मुलींमध्ये जिवलग मैत्री होती. दोघीही दिवसातील बराच वेळ एकमेकींसोबत घालवत होत्या. एकमेकींचे सुख-दु:ख त्या शेअर करत. पण, एक दिवस त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि या जिवलग मैत्रिणी दुरावल्या. यातील एक ही झालेली घटना विसरून गेली. मात्र, दुसऱ्या मैत्रिणीच्या मनामध्ये या वादाची सल कायम होती. त्यामुळे तिने बदला घेण्याचा निर्धार केला.
मैत्रिणीकडून बदलाही घेता येईल आणि आपले नावही समोर येणार नाही, यासाठी तिने अजब शक्कल लढवली. या दुसऱ्या मुलीने सर्वप्रथम एक फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडले. त्यानंतर बनावट अकाऊंटवरून तिने आपल्या मैत्रिणीची प्रोफाईल उघडली. यावेळी तिने मैत्रिणीने डीपीवर ठेवलेले फोटो कॉपी करून सेव्ह केले. त्यानंतर सदर फोटो तिने एका अनोळखी तरुणाच्या फोटोसोबत बनावट अकाऊंटवर अपलोड केले.
सूडभावनेतून तिने आपल्याच जिवलग मैत्रिणीची समाजात आणि नातेवाईकांमध्ये बदनामी केली. हा धक्कादायक प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणाची सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मिळालेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरू केला. तब्बल ५ महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी मैत्रिणीचा शोध घेऊन तिला अटक केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, सहायक पोलीस निरीक्षक विशाल खलसे, उपनिरीक्षक अरविंद राऊत यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत कुरई, प्रमोद खुजे, दीपक कळसकर, मनिष धोटे, राजाभाऊ खंडारे, सागर भटकर, अश्विन मानकर, सागर धापड, आशिष भुंबरे, विकास अंजिकर, सिध्दार्थ इंगळे, रेश्मा खडसे आदींच्या पथकाने केली.