नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) व्याजावरच्या अनुदानासहीत इतर मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. मोदींनी अशा प्रकारची घोषणा केल्यास एमएसएमई क्षेत्राला गती मिळेल आणि रोजगार वाढण्यासाठीही मदत होणार आहे. केवळ ५९ मिनिटात ऑनलाईन अर्ज करून १ कोटी पर्यंत कर्ज मिळविता येणार आहे.
जास्त व्याजावर अनुदान दिल्यास कर्जे स्वस्त होतील आणि एमएसएमई क्षेत्रात कर्ज घेण्याचे प्रमाण वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेची लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय या प्रस्तावावर काम करत आहे. एमएसएमई सेक्टरमध्ये 6.3 कोटींहून अधिक युनिट्स आहेत आणि 11.1 कोटी लोकांना या युनिट्समधून रोजगार मिळतो. जीडीपीतही या क्षेत्राचं 30 टक्के योगदान आहे.
उत्पादनातही या क्षेत्राची 45 टक्के भागीदारी आहे. देशातील एकूण निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये या क्षेत्राचे 40 टक्के योगदान आहे. एमएसएमई युनिट्स समोर कर्जाची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे उद्योगाला उपयुक्त कर्ज अनुदानाच्या माध्यमातून मिळाल्यास या क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.