मावळ्यांचा अपमान सहन करणार नाही

0

पुणे :- सध्या लग्न सराई सुरु आहे. त्यात हॉटेल, केटरिंग आणि इव्हेंटच्या कार्यक्रमात जेवण वाढणारे किंवा लग्नात काम करणारे कामगार यांना मावळ्यांच्या पोशाखात पगडी, भाला व इतर पोशाख घालून वेटरचे काम करावयास लावत आहे. हा त्या मावळ्यांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मावळे’ ही मराठी मनाची अस्मिता असून मावळे हे महाराष्ट्राचा अभिमान आहे. यापुढे शिवाजी महाराजांचा मावळा जर ‘वेटर’ म्हणून दिसला तर ब्रिगेडी स्टाईलने कारवाई करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ आणि जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये हॉटेल, केटरिंग तसेच इव्हेंट ऑरगनायझेशन चालवणारे, डायरेक्टर तसेच पदाधिकारी आणि लग्नसोहळ्यातील मंडळींना आवाहन करण्यात आले आहे. छत्रपतींच्या मावळ्यांची अशाप्रकारे होणारी अहवेलना टाळा अन्यथा अशा केटरिंग आणि इव्हेंट ऑरगनायझेशनच्या कर्मचाऱ्यांवर ब्रिगेडी स्टाईलने कारवाई केली जाईल. तसेच ज्यांच्याकडे लग्नसोहळा आहे अशांनी या अवमान करणाऱ्या लोकांना ऑर्डर्स देऊ नये अन्यथा लग्नसोहळ्यात विघ्न निर्माण झाल्यास त्याला शिवप्रेमी जबाबदार राहणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.