[व्हिडीओ] वाघ समर्थकांचा महाजनांच्या कार्यालयात ठिय्या

0

उमेदवारी रद्द झाल्याने कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक

जळगाव । भारतीय जनता पार्टीने आज अचानक आ. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून आ. उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. या नाट्यमय घडामोडीनंतर वाघ समर्थकांमध्ये प्रचंड उद्रेक होऊन कार्यकर्त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाविरूध्द त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डाने दुसर्‍या यादीत जळगाव लोकसभेतून आ. स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ. वाघ यांनी प्रचारदेखील सुरू केला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आ. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्दच्या चर्चा व्हायरल होत होत्या. अखेर आज पक्षाने आ. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे भाजपाचे आ. उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले.

या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर वाघ समर्थकांनी विसनजीनगरातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील, मच्छिंद्र पाटील, जि.प.शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशन कार्यालयाकडे वळविला. या ठिकाणी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ना. महाजनांच्या कार्यालयाच्या प्रांगणातच ठिय्या आंदोलन करून आ. स्मिता वाघ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच पक्षाविरूध्द नाराजी देखील व्यक्त केली. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी आ. स्मिता वाघ व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे दोघेही महाजनांच्या कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

आ. स्मिता वाघांनी हात जोडले

तिकीट रद्द झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या घोषणाबाजीपुढे आ. स्मिता वाघ यांनी अक्षरश: हात जोडले. त्यांनी विनंती करीत घोषणाबाजी न करता आपण पार्टीचे पाईक कार्यकर्ते आहोत, असे सांगून प्रत्येकाला घरी जाण्यास सांगितले. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.

निष्ठावंत हाच आमचा दोष – आ. स्मिता वाघ

स्मिता वाघ यांनी सांगितले की, महाविद्यालयीन जीवनापासून मी पक्षाचे काम करत असून, पक्षाने जी काही माझ्यावर जबाबदारी टाकली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आता देखील पक्षाने ज्या प्रकारे माझे तिकीट निश्चित करून, ऐनवेळी कापले त्यामुळे दु:ख झाले असल्याचेही वाघ यांनी सांगितले. आम्ही निष्ठावंत आहोत हाच आमचा दोष असल्याचेही त्या म्हणाल्या. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी पक्षादेशाप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

आ. उन्मेष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

दाखल जिल्हा भाजपात एकीकडे नाराजीनाट्य सुरू होते, तर दुसरीकडे आ. उन्मेष पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू होती. आ. उन्मेष पाटील हे जळगावात आल्यानंतर समर्थकांसह त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, रिपाइंचे अनिल अडकमोल आदी उपस्थित होते. आ. उन्मेष पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाराज झालेल्या आ. स्मिता वाघ यादेखील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहिल्या.