जळगाव : रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांची बहीण स्नेहजा प्रेमानंद रुपवते ऊर्फ सुलुताई (वय ६५ ) यांचा रविवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पाळधी फाट्या जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मुलीचे लग्न शनिवारी होते. त्यानिमित्त स्नेहलता रुपवते खिरोद्याला आल्या होत्या. भाचीचे लग्न आटोपल्यानंतर त्या नातेवाईकांसह मुंबईकडे कारने जात होत्या. परंतु पाळधी फाट्या जवळ त्यांची भरधाव कार कलंडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कारचालकांसह तीन जणांना जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. स्नेहजा प्रेमानंद रुपवते या बांद्रा येथील चेतना इन्स्टिटयूटच्या संचालिका होत्या. त्या विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांची कन्या, माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची सून, अॅड. प्रेमानंद रुपवते यांच्या पत्नी होत.
महर्षी दयानंद महाविद्यालय वडाळा मुंबई येथून त्या अध्यापनाचे कार्य करीत होत्या. त्या मुंबई आणी नगर परिसरातील अनेक शैक्षणिक आणी सामजिक संस्थात कार्यरत होत्या. कुसुमताई चौधरी महिला कल्याणी संस्था तसेच मुंबईतील मलबार हिल येथील बालकल्याणी संस्थेच्या अध्यक्षा होत्या. जळगावात 2005 मध्ये संपन्न झालेल्या राज्यव्यापी महिला कवयित्री संमेलन ‘कुसुमांजली’ च्या त्या मुख्य आयोजक होत्या. नंतर असे संमेलन त्यांनी नगर कोल्हापूर आणी औरंगाबाद येथे आयोजित केले होते.
