पुणे – पिंपरीतील साबण व्यापाऱ्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रदीप हिंगोरानी (५२, रा. पिंपरी मार्केट, डी ब्लॉक) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. हा खून संशयास्पद असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप हे पिंपरीमधील साबणाचे होलसेल व्यापारी होते. त्यांच्या घरी त्यांची आई आणि ते असे दोघेच राहत होते. सकाळी सातच्या सुमारास घरकाम करणारी मोलकरीण घरी आली. त्यावेळी प्रदीप यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला.
मोलकरणीने घरात बघितले असता प्रदीप यांच्या आई घरातील समोरच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. मोलकरणीने घरात न जाता शेजारच्या लोकांना याबाबत सांगितले. शेजाऱ्यांनी घरात बघितले असता, प्रदीप स्वयंपाक घरात मृतावस्थेत पडलेले आढळून आले. त्यांचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करत आहेत.