या सोशल साईट्सना १ लाखाचा दंड

0

नवी दिल्ली: चाईल्ड पॉर्न आणि बलात्काराच्या व्हिडीओविरोधात पावले न उचलणाऱ्या सोशल नेटवर्किंग साईट्सना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. कोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअॅप, गुगल इंडिया, याहू आणि मायक्रोसॉफ्ट यांना प्रत्येकी १ लाखाचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती बी लोकूर आणि न्यायमूर्ती उमेश ललित यांच्या खंडपीठाने १६ मे रोजी हा निर्णय दिला.

सोशल साईट्सवर अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ आहेत. चाईल्ड पॉर्न आणि बलात्काराच्या व्हिडीओवरुन, सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने या सोशल साईट्सना तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले होते. तसेच हे व्हिडीओ हटवण्यासाठी काय उपाययोजना केली त्याबाबतची माहिती द्या, असेही कोर्टाने सांगितले होते.

मात्र यापैकी कोणत्याही वेबसाईटने या व्हिडीओंबाबत काहीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच कोर्टाने 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला. कोर्टाने या वेबसाईट्सना १५ जूनपर्यंत उत्तर देण्याचे आदेशही दिले आहेत. या वेबसाईट्सनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करावं, त्यासोबत दंड म्हणून 1 लाख रुपये जमा करावे, असे कोर्टाने सांगितले आहे.