मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज २६ डिसेंबर रोजी जयंती आहे. त्यानिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे. त्यांचे समाजकार्य, त्यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा या सगळ्याचा आढावा या खास डुडलमधून घेण्यात आला आहे.
डॉ. मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटेंचे मूळ नाव आहे. चंद्रपुरात कुष्ठरोग्यांना आपले म्हणणारा आनंदवन हा आश्रम त्यांनी सुरु केला. तसेच नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांचा प्रमुख सहभाग होता. बाबा आमटेंनी एका कुष्ठरोग्याला पावसात भिजताना पाहिलं. त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हतं. त्यांनी एक क्षण असा विचार केला की त्या कुष्ठरोग्याच्या जागी जर मी असतो तर? आणि दुसऱ्या क्षणी बाबा त्या माणसाला घेऊन घरी गेले. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचाच ध्यास घेतला.