देशात काही लोकांना अति स्वांतत्र्य आहे: न्या.शरद बोबडे

0

नवी दिल्ली: देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्रातील शरद बोबडे यांची निवड करण्यात आली आहे. शरद बोबडे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आपल्या देशात काही लोकांना अभिव्यक्तीचं अति स्वातंत्र्य आहे. सार्वजनिकरित्या व सोशल मीडियात काहीही बोलून हे लोक सुरक्षित राहतात. पण काही जण छोट्याशा कारणावरून विनाकारण लक्ष्य ठरतात. तसेच न्यायालयांमध्ये महिला न्यायमूर्तींची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे १८ नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर आपली विस्तृत मते मांडली. देशात सध्या सुरू असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यामधील भेद अगदी स्पष्ट जाणवणारा आहे. काहींना नको तितकं स्वातंत्र्य आहे. काही लोकांना मात्र तोंड उघडताच अडचणींचा सामना करावा लागतोय. निवडक लोकांना अमर्याद स्वातंत्र्य असण्याचा असा काळ आधी कधीच नव्हता,’ असं बोबडे म्हणाले.

न्यायालयांमध्ये महिला न्यायमूर्तींची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मी याबाबतीत अत्यंत निष्पक्ष दृष्टिकोन ठेवून काम करणार आहे. मात्र, महिला न्यायमूर्तींची उपलब्धतात ही आपल्याकडं मोठी अडचण आहे. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पद मिळण्यासाठी महिलांचं वय ४५ वर्षे असणं गरजेचं आहे. त्यामुळं एका रात्रीत ही संख्या वाढणार नाही. एका निश्चित प्रक्रियेतूनच आपल्याला जावं लागेल,’ असं ते म्हणाले.