नवी दिल्ली-ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याच वर्षी जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २०१४ मध्येही त्यांना असाच त्रास जाणवला होता.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. १४ व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र आहेत.
चॅटर्जी यांनी नुकताच पंचायत निवडणुकांवरून राज्य निवडणूक आयोगावर टीका केली होती. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत पश्चिम बंगालच्या निवडणुकीत इतका हिंसाचार पाहिला नसल्याचे त्यांनी म्हटले होते. दहा वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेले चॅटर्जी यांनी १९६८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. १९७१ मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते.