अभिषेक मनू सिंघवीवर सोनिया गांधी संतापल्या; त्या वक्तव्यावरून माफी मागण्याचे आदेश !

0

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याला कॉंग्रेसने विरोध केल्याने देशातील राजकारणाला नवीन वळण लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा केली आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणे चांगलेच महागात पडले आहे. यावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी कमालीच्या संतप्त झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकरवी सिंघवी यांना संदेश पाठवून फोन करण्यास सांगितले. तसेच या प्रकरणी स्पष्टीकरण मागवून दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले.

सोमवारी अभिषेक मनू सिंघवी यांनी एक ट्विट करून सावरकर यांची प्रशंसा केली. ”मी वैयक्तिकरीत्या सावरकरांच्या विचारसणीचे समर्थन करत नाही. मात्र सावरकर हे एक परिपूर्ण व्यक्ती होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. दलितांना अधिकार मिळवून देण्यासाठी लढाई लढली आणि देशासाठी तुरुंगवासही भोगला. हेही नाकारत नाही.” असे सिंघवी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

अभिषेक मनू सिंघवी यांच्या ट्विटमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. स्पष्टीकरण देण्यासाठी सिंघवींवर दबाव वाढवण्यात आला. त्यामुळे अखेरीस सिंघवी यांना प्रसारमाध्यमांवर येऊन माफी मागावी लागली. सिंघवी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सिंघवी यांना फोन केला. हा फोन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.