मुंबई- मान्सून अंदमानच्या दक्षिण भागात दाखल झाला असून लवकरच तो केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यंदा भारतात मान्सून लवकर दाखल होणार असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा मान्सून दाखल झाला आहे.
लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार
अंदमानमधून हा मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर भारताच्या इतर भागात दाखल होतो. देशाच्या सर्व भागात मान्सून दाखल होण्यासाठी हवामान अनुकूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. लवकरच हा मान्सून महाराष्ट्राबरोबर गोव्यातही दाखल होणार आहे. त्याबरोबरच येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाने शरीराची झालेली लाहीलाही आता काही प्रमाणात कमी होणार असल्याची चिन्हे आहेत.
सात दिवस आधी पाऊस
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर त्यापुढील २४ ते ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडी या मार्गाने वाटचाल करतो. दरवर्षी साधारणत: १ जून रोजी मोसमी पावसाचा केरळमध्ये प्रवेश होतो. मात्र, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदाचे वर्ष अपवादात्मक असणार आहे. नियोजित वेळेच्या सात दिवस आधीच पावसाचा प्रवेश होणार आहे.
मागील वर्षी ३० मे रोजी मोसमी पाऊस केरळच्या किनारपट्टीवर आला होता. यंदा केरळच्या किनारपट्टीजवळ २५ ते २७ मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन तेथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याबरोबरच २५ ते ३१ मे दरम्यान दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सध्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा येथे मान्सूनपूर्व पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. स्कायमेटकडूनही मान्सून यंदा वेळेआधी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.