स्पायडर मॅनचे निर्माते स्टेन ली यांचे निधन

0

न्युयोर्क-अमेरिकेतील प्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे प्रसिद्ध लेखक-संपादक-प्रकाशक स्टेन ली यांचे ९५ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा मानले जाणारे ली यांनी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

२८ डिसेंबर १९२२ मध्ये न्यूयॉर्कमध्ये त्यांचा जन्म झाला होता. १९६१ मध्ये त्यांनी दि फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले होते. त्यानंतर यामध्ये स्पायडर मॅन, एक्स मॅन, हल्क, आयरन मॅन, ब्लॅक पँथर, थोर, डॉक्टर स्टेंज आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंची पात्रे समाविष्ट झाली.

ली यांनी लिहीलेल्या या सुपरहिरोंवर कालांतराने चित्रपटही तयार झाले. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. त्याचबरोबर मार्वलच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक चित्रपटामध्ये स्टेन ली यांनी विशेष भुमिकाही साकारली. कॉमिक्सशिवाय ली यांनी चित्रपटांसाठी पटकथाही लिहील्या आहेत.

स्टेन ली यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांनी २०१३मध्ये आपला ‘चक्र’ नामक पहिला भारतीय सुपरहिरोवरील चित्रपट बनवला. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया आणि पाओ इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने तयार झालेला ‘चक्र : द इन्व्हिझिबल’ हा चित्रपट कार्टून नेटवर्कवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात एक भारतीय तरुण राजू रायची गोष्ट आहे. जो मुंबईमध्ये राहतो. राजू आणि त्याचे मार्गदर्शक डॉ. सिंह एक असा तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक पोषाख तयार करतात ज्यामुळे शरीरातील रहस्यमयी चक्रे सक्रिय होत असतात.