जिल्हा बँक निवडणूक विशेष : भाजपाच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीकडून ‘सुरूंग

 

दगडी बँक म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. बँकेवर 21 पैकी 20 जागा मिळवत महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातही तो राबविण्यात आला आणि यशस्वीही ठरला. जळगाव जिल्हा हा एकेकाळी भाजपा-शिवसेना युतीचा बालेकिल्ला होता. आता मात्र सत्ता समीकरणे बदलली. जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेले एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपाला मोठा धक्का बसला. खडसेंनंतर संकटमोचक असलेले आमदार गिरीश महाजन यांच्याकडे भाजपाची धुरा आली. भाजपाच्या सत्ताकाळात आ. गिरीश महाजन यांनी जळगाव, धुळे, नाशिक आणि अहमदनगर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळवून दिले. मात्र जशी सत्ता गेली तशी संकटमोचक गिरीश महाजन यांचीही जादू ओसरली. सुरूवातीला जळगाव महापालिकेत भाजपच्या सत्तेला शिवसेनेने सुरूंग लावला. त्यानंतर आता जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा बँकेत चर्चेच्या फेर्‍यां

मध्ये गुंतवून महाविकास आघाडीने सत्ता काबीज करीत भाजपाला ‘मामा’ बनविले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलची संकल्पना मांडली. त्यासाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकाही झाल्या. मात्र काँग्रेसने यु-टर्न घेत भाजपासोबत जाण्यास नकार दिला आणि इथेच भाजपाची गोची झाली. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनेही भाजपाला दूर ठेवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्ह्यात राबविण्यात आला. या निवडणुकीत संकटमोचक गिरीश महाजन हे महाविकास आघाडीसाठी मोठे आव्हान उभे करतील अशी अपेक्षा होती. मात्र फसवणूक झाल्याचा सोयीस्कर आरोप करीत आमदार गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत निवडणुकीतून माघार घेतली. भाजपाच्या माघारीनंतर ही निवडणूक एकतर्फीच झाली.

उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस

मधील काहींनी शेतकरी पॅनल उभे केले. सहकार विरूध्द शेतकरी अशी लढत झाली. मात्र या लढतीत शेतकरी पॅनलचा पुरता धुव्वाच उडाला. जिल्ह्यात प्रथमच भाजपाच्या बालेकिल्ल्याला

महाविकास आघाडीने सुरूंग लावला. महाविकास आघाडीच्या या विजयाचे आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दुरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

खडसेंचे यशस्वी मार्गदर्शन

गेल्या 40 वर्षांपासून एकनाथराव खडसे यांचे जिल्ह्यात वर्चस्व राहिले आहे. जिल्हा बँकेतही ते ज्येष्ठ संचालक म्हणून बिनविरोध निवडून येतात. यंदाच्या निवडणुकीत काही बैठका सोडल्या तर प्रकृती अस्वास्थामुळे ते समोर दिसले नाही. मात्र, अशाही परिस्थितीत त्यांनी सहकार पॅनलला मार्गदर्शन केले. रावेरात जो धक्कादायक निकाल लागला त्याचे रणनितीकार एकनाथराव खडसेच ठरले. अरूण पाटील यांनी भाजपाशी जवळीक केल्याने त्यांना आणि भाजपाला धडा शिकविण्यासाठी पाठिंबा दिलेल्या जनाबाई

महाजन यांना निवडून आणले. निकालानंतर रावेरचा निकाल हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला.