भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

0

इंदूर (मध्यप्रदेश) । आध्यात्मिक गुरु म्हणून ओळख असलेले भय्यू महाराज यांनी इंदूरमधल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या केली.  त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाजवळ इंग्रजीमध्ये लिहिली सुसाईड नोट सापडलेली आहे. इंग्रजी भाषेत सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे की, आयुष्यातील ताण-तणावांनी खूप व्यथित झालोय…माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेले आहे.

भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केली त्यावेळी घरात त्यांच्या पत्नी आणि आईही होत्या. गोळीच्या आवाजाने सर्वजण त्यांच्या खोलीकडे धावले असता खोलीचे दार आतून बंद होते. तेथे असलेल्या अनुयायांनी दार तोडून आत प्रवेश केला असता भय्युजी महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यांना तातडीने इंदुरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले जाते. तसेच सामाजिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे.त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्तींचा वावर असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्यू महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले होते.