वरणगांवातील पाणी टंचाईवर राजकारणाचा शिडकावा !
तापीनदीतील पाणी पातळी खालावल्याने शहरात कृत्रीम पाणी टंचाई
विजय वाघ | वरणगांव
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने तसेच जॅकवेल मध्ये गाळ साचल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे . यामुळे शहरवासीयां मध्ये संताप व्यक्त केला जात असुन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजकारण तापले असुन श्रेय वादातुन भाजप व मविआ कडून राजकारणाचा शिडकावा सुरु झाला आहे .
वरणगांव शहराला तपत कठोरा येथील तापी नदी पात्रातुन पाणी पुरवठा केला जातो . मात्र, अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात . याच प्रमाणे महामार्गावरील जलवाहीनी बदलविण्याच्या कामामुळे पाच दिवस पाणी पुरवठा ठप्प ठेवण्यात आला होता . तर या जलवाहीनीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तापी नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने पाणी पुरवठा पुन्हा ठप्प झाला तसेच पाण्याचा उपसा करणाऱ्या जॅकवेल मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर गाळ काढण्याचे काम सुरू केले . तसेच या तांत्रिक अडचणीमुळे शहरातील पाणीपुरवठा काही दिवस ठप्प राहील अशी शहरात दवंडी देण्यात आली असता शहरातील काही भागातील नियोजनानुसार सुटणाऱ्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला . यामुळे संतप्त झालेल्या महिला व पुरुषांनी नगर परिषदेचे दवंडी देणारे वाहन अडवुन कर्मचाऱ्यांना वेठीस धरले असता कर्मचाऱ्यांनी वरीष्ठांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही . यामुळे नागरीकांच्या संतापात अधिक भर पडल्याने याची संधी साधून भाजप व महाविकास आघाडीने नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरण्याची कुरघोडी सुरु केली . यामध्ये शिवसेनेने ( ठाकरे गट ) नगर परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन केले तर भाजपच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी सहकाऱ्यांसह हतनुर धरणातून तातडीने आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी करीत हतनुर धरणावर ठिय्या आंदोलन केले तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी सहकारी बांधवांसह नगर परिषद प्रशासनाला निवेदन देवून पाणी पुरवठा सुरळीत नाही झाल्यास संबधीत अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला . यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रकारचे आंदोलन करून राजकीय शिडकावा केल्याचे दिसून आले . तर सांयकाळी हतनुर धरणातुन आवर्तन सोडण्यात आल्याने शहरवासीयांना पाणी टंचाईतुन दिलासा मिळणार असून नगर परिषद प्रशासनाने पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही यासाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक असल्याचीही मागणी होत आहे .
मुख्याधिकारी तळ ठोकून
तापी नदी पात्रातील जॅकवेल मध्ये साचलेला गाळ काढणे तसेच नदी पात्रात पाटचारी खोदण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी चार दिवस एकसारखे काम करीत होते . तर शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मुख्याधिकारी समीर शेख व पाणीपुरवठा अभियंता शुक्रवारी दिवसभर कामाच्या ठिकाणी उपस्थित होते . तसेच त्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा शहरवासीयांना आवाहन केले आहे .
उन्हाळ्या पूर्वीच पाणी टंचाईच्या झळा
तांत्रिक कारणांमुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरवासीयांना उन्हाळ्या पूर्वीच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे . तर पाणी टंचाईच्या काळात नागरीकांना दिलासा देणारे शहराच्या विविध भागातील आठ हातपंप दुरुस्ती अभावी बंद पडले असून दुरुस्ती धारकांना वेळेवर रक्कम अदा केली जात नसल्याने दुरुस्तीचे काम करण्यास कुणी पुढाकार घेत नसल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली आहे .
टँकरने पाणीपुरवठा
शहराच्या विविध भागात पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्याने राजकीय पक्षाचे पदाधिकारी आप आपल्या प्रभागात पदरमोड करीत स्वखर्चाने खाजगी टँकरने पाणीपुरवठा करून पाणी टंचाईवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत .