एसटी. बँक आणि पतपेढी कर्मचारी सांगून फुकट प्रवास, कारवाईचा इशारा
जळगाव | प्रतिनिधी
राज्यभरातील एसटी को-ऑप बँक आणि एसटी. पतपेढी कर्मचारी राज्य परिवहन महामंडळाचेच कर्मचारी असल्याचे सांगून एसटी बसमधून मोफत प्रवास करीत असल्याच्या तक्रारी विविध विभागातील कार्यालयांना प्राप्त झाल्या आहेत. यापुढे एसटी को-ऑप बँकेचा कर्मचारी राज्य परिवहन कर्मचारी म्हणून प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्याबाबतचे परिपत्रकच वाहतूक महाव्यवस्थापकांनी काढले आहे.
एसटी को-ऑप. बँकेचे राज्यात 81 हजार सभासद तसेच राज्यात अनेक पतसंस्था राज्य परिवहन कर्मचार्यांच्या आहेत. यात जिल्ह्यात एसटी कर्मचारी पतसंस्थेचे कर्मचारी पतसंस्थेचे 2900 वर सभासद संख्या आहे. राज्यसह जिल्ह्यातील एसटी बँक कर्मचारी ओळख, कर्जवितरण जास्त पटीने देण्याचे आमिष या नावाखाली एसटी बसमधून दररोज अप-डाऊन फुकट करतात. परिणामी एसटीचे नुकसान होत आहे. अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पथक, वाहक यांना सूचनाही देण्याचे महामंडळाने परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
एसटी बँक कर्मचार्यांनी अनेक विभागात बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून प्रवास, अनेक ठिकाणी बँक निरीक्षकही महामंडळाच्या गाड्यांमधून स्टाफ बनून फिरतात. हे निरीक्षक फुकटात प्रवास तर करतातच त्याचबरोबर उतरताना प्रवाशांचे तिकीट घेऊन तेच बँकेत सादर करतात. परिणामी बँकेसह एसटीचेही नुकसान होते. जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर म्हणाले की, वाहतूक महाव्यवस्थापकांडून या आशयाचे परिपत्रक आले आहे. राज्यात अशा घटना घडत असतील, मात्र जळगाव विभागात अशी नोंद नाही. मात्र, बँक/पतसंस्था कर्मचारी अशा पद्धतीने फुकट प्रवास करीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.