जळगाव: जिल्ह्यात आरटीईच्या माध्यमातून प्रवेश देण्याची सुरुवात आज पासून होणार असून जिल्ह्यातील शाळांमध्ये 3065 जागांसाठी प्रवेश देता येणार आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो ज्यात या वेळेस 296 शाळा पात्र ठरल्या आहेत. या सर्व शाळांमधील 3065 जागांसाठी आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून 3 ते 21 मार्च दरम्यान पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत अंतर्गत प्रवेशासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरायचे आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 21 मार्चपर्यंत आहे. आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर 2020-21 करीता पात्र 296 शाळांची नोंदणी पुर्ण झाली आहे. इच्छुक पालकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी, अर्ज भरताना योग्य ती काळजी घ्यावी. यंदाही एकच सोडत जाहीर होणार असून त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेनंतर प्रतीक्षा यादीत विद्यार्थ्यांना फेरी निहाय प्रवेश दिला
जाणार आहे.