पुणे : 30 एप्रिल ते 3 मे दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून 4 मेरोजी मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. 1 ते 2 मेरोजी विदर्भात बर्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात एक ते दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 3 मेरोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात व विदर्भात एक ते दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून 4 मे विदर्भात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
चंद्रपूर येथे 46.4 अं. से. तापमान
मध्य-महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या
तुलनेत उल्लेखनीय वाढ तर कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनते किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या
उर्वरित भागात सोमवारी तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे 46.4 अं. से. नोंदवले गेले.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तप्त
विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील पार्याने चाळीशी पार केली. राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट असून 3 मेपर्यंत विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. रविवारी राज्यात चंद्रपूर येथे 46.4 अंश एवढे सर्वाधिक कमाल तापमान नोंद झाले. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात वर्धा, नागपूर, चंद्रपूर व ब्रम्हपुरी येथे पारा 45 च्या वर पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे 21.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही लोहगाव (पुणे), अहमदनगर, जळगाव, मालेगाव, सातारा व सोलापूर येथे पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.
तापमान वाढत चालले
गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुढील प्रमाणे : मुंबई (कुलाबा) 33.8 सांताक्रूझ 33.2, अलिबाग 35.3, रत्नाचगरी 33.4, पणजी (गोवा) 33.7, डहाणू 33.6, पुणे 39.1, अहमदनगर 43.8, जळगाव 43.4, कोल्हापूर 36.8, महाबळेश्वर 33.2, मालेगाव 43.0, नाशिक 38.1, सांगली 39.5, सातारा 40.0, सोलापूर 43.5, औरंगाबाद 41.5, परभणी 44.7, अकोला 44.7, अमरावती 43.8, बुलढणा 41.2, ब्रह्मपुरी 46.0, चंद्रपूर 46.4, गोंदिया 42.5, नागपूर 45.2, वर्धा 45.8, यवतमाळ 44.0.