मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांचा राज्यस्तरीय मेळाव्यात सरकारला बेमुदत बंदचा इशारा

धुळे – मुद्रांक विक्रेता व दस्तलेखकांचा राज्यस्तरीय मेळावा धुळे येथे उत्साहात संपन्न झाला. सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी नंदुरबारचे जेष्ठ मुद्रांक विक्रेते भिकाभाऊ चौधरी हे होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातील मयत झालेले मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आयोजक मा. नगरसेवक दिलीप आप्पा देवरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेता व्यवसाय सुरु आहे. १०० वर्षांमध्ये शासनाकडून कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. परंतु गेल्या १०-१५ वर्षापासून शासनाने आम्हास अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भात मेळाव्यात अनेक विषयांवर बोलतांना सांगितले की, राज्य शासनाने छपाई केलेले हजारों करोडोंचे स्टॅम्प महाराष्ट्राच्या ट्रेझरीमध्ये शिल्लक पडलेले आहेत. सदर स्टॅम्प मुद्रांक विक्रेत्यांना उपलब्ध करुन द्यावेत.

५०० च्या पुढील सर्व स्टॅम्प विक्रीकरीता देण्यात यावेत. मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस वारसा हक्काने परवाना मिळावा. या ठिकाणी मुद्रांक विक्रेत्यांना बसण्याची जागा नाही, त्यांना बसण्यासाठी शासनाने व्यवस्था करावी. मुद्रांक विक्रेत्यांना मदतनीस ठेवण्याची परवानगी मिळावी. शासनाने गेल्याच महिन्याच ३० हजार रुपयांच्या विक्रीची मर्यादा १० हजार रुपयांवर केली, ती पूर्ववत करण्यात यावी. मुद्रांक विक्रेत्यांना स्टॅम्प विक्रीवर देण्यात येणारी मनुती ५% करावी. मुद्रांक विक्रेता हा शासनास दरवर्षी हजारो, करोडोचा महसुल मिळवून देत असतो. तरी आमच्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. तरी शासनास आमची नम्र विनंती की, येत्या पावसाळी अधिवेशनापर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर, महाराष्ट्रातील सर्व मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला.

यावेळी दिलीप देवरे, भिकाभाऊ चौधरी, अशोक कदम, शंकर यादव यांनी मार्गदर्शन केले. तसेच मोहन वाघ, अलका देशमुख, विनोद देशमुख, वैशाली हिंगमिरे, दिपक सरवटे, नितीन गांधी, राजेश कुलकर्णी, वासुदेव चव्हाण, सुभाष देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून बहुसंख्य मुद्रांक व दस्तलेखक उपस्थित होते. सदर मेळाव्याचे सुत्रसंचालन मुद्रांक विक्रेता भालचंद्र भांडारकर यांनी केले. आभार प्रदर्शन वासुदेव चव्हाण यांनी केले.