टोकरे कोळी समाजाच्या तरूणांसमोर ना. गुलाबराव पाटलांची कबुली
जळगाव – टोकरे कोळी समाजातील प्रलंबीत मागण्या आणि जात वैधता प्रमाणपत्रांसाठी सरकार दरबारी आवाज उठविण्यात माझी ताकद अपुरी पडल्याची स्पष्ट कबुली खुद्द सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज टोकरे कोळी समाजातील तरूणांसमोर दिली. ना. गुलाबराव पाटील यांच्या कबुलीमुळे मतदारसंघातील तरूणांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठविली.
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आज जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या दौर्यावर होते. या दौर्यादरम्यान ते जळगाव तालुक्यातील विदगाव या गावाजवळून जात असतांना त्यांची गाडी टोकरे कोळी समाजातील काही तरूणांनी अडविली. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना खाली उतरण्यास भाग पडले. तरूणांनी ना. पाटील यांना याप्रसंगी घेराव देखिल घातला. यावेळी तरूणांनी जिल्ह्यातील टोकरे कोळी समाजाच्या मागण्यांसंदर्भात अनेकवेळा आंदोलने करूनही न्याय मिळाला नाही. तसेच समाजातील जात वैधता प्रमाणपत्राचा देखिल प्रश्न प्रलंबीतच आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षात हे आश्वासन पुर्ण केले नाही. समाजातील कुठल्याही घटकाला न्याय मिळत नाही, अशा एक ना अनेक समस्यांचा पाढाच तरूणांनी ना. गुलाबराव पाटील यांच्यासमोर मांडून त्यांना जाब विचारला. यावेळी हतबल झालेल्या ना. गुलाबराव पाटील यांनी चक्क माझी ताकद अपुरी पडल्याची कबुली तरूणांसमोर दिली. ना. गुलाबरावांच्या कबुलीमुळे तरूणांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तसेच मतदारसंघातील तरूणांना न्याय मिळत नसल्याने ना. गुलाबराव पाटील यांच्याविरूध्द टिकेची झोड देखिल उठली.
तरूणांचा उद्रेक अन् गर्दी
विदगाव गावाजवळ टोकरे कोळी समाजातील तरूणांच्या संतापाचा आज उद्रेक झाला. ना. गुलाबराव पाटील यांचे वाहन अडविल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. दुपारच्या सुमारास तरूणांनी ना. पाटील यांना हा घेराव घालून चांगलेच अडचणीत आणल्याची चर्चा परीसरात सुरू होती.