शहादा l शहादा ते सारंगखेडा व शहादा ते शिरपूर रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी सुमारे चार महिन्यांपूर्वी शहादा येथे शेतकरी संघर्ष समिती, विविध संघटना, राजकीय पक्षांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलनाची दखल घेत संबंधित विभागाने तात्पुरती डागडुजी केली होती. परंतु आता रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून शहादा ते सारंगखेडा व शहादा शिरपूर रस्ता दुरुस्ती न झाल्यास येत्या आठ दिवसात शेतकरी हितासाठी पुन्हा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत पाटील यांनी शहादयाचा तहसीलदारांना दिला आहे.
शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांना रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात रस्ता रोको बाबत निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की, शेतकरी संघर्ष समिती सोबत विविध संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने नोव्हेंबर २०२२ ला संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने रस्त्याचे डांबरीकरण व इतर बाबींसाठी सदरील काम मंजूर होणे बाबत बैठकीत आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन स्थगित करून सहकार्य केले होते. सध्या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे. पावसाळा जवळच आल्याने पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे .धुळे जिल्ह्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करून दुरुस्ती केल्याचे दिसून येते. यासंबंधी पुन्हा गेल्या महिन्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सदर महामार्गावरील लांबी मध्ये नवीन डांबरीकरणासाठी मंजुरी घेऊन शिरपूर शहादा व दोंडाईचा सारंगखेडा शहादा रस्ता तयार करण्यात यावा असे निवेदन धुळे येथील कार्यकारी अभियंतांना दिले होते. त्यासोबतच शेतकरी संघर्ष समिती, सर्व संघटना, राजकीय पक्ष व नागरिक यांच्या वतीने भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल याचीही सूचना निवेदनाद्वारे दिली होती. तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने शेतकरी हितासाठी पुन्हा तीव्र आंदोलनाची रणनीती आखण्याच्या इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात अभिजीत पाटील व शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे .निवेदन देताना माजी सभापती अभिजीत पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष वाल्हे, नवीन पाटील, तुषारगिरी गोसावी आदी उपस्थित होते.
” शहादा शिरपूर व शहादा सारंगखेडा रस्त्यावर वाहन चालवताना कमालीची कसरत करावी लागते. छोटे-मोठे अपघात नित्य होत असतात. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने शेतकरी हितासाठी येत्या आठ दिवसात मोठे आंदोलन उभे केले. जाणार.”
—-अभिजित पाटील (माजी सभापती जिल्हा परिषद, नंदुरबार)