गांधीनगर- नर्मदा नदीतील सरदार सरोरवरामध्ये लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने या पुतळ्याला जगभरात ओळखले जाणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निर्मितीव्रून राजकीय वर्तुळ आणि समाजामध्ये मतमतांतरे निर्माण झाली होती. पण सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. येथे उभारण्यात आलेली सरदार पटेल यांची भव्य प्रतिमा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत आहेत. दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुमारे 75 हजार पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली असून, केवळ येथील तिकीटविक्रीमधूनच सुमारे अडीच कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 31 ऑक्टोबर रोजी लोकार्पण झाले होते. मात्र या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या प्रवेश फीपेक्षा सातपट अधिक महाग असल्याने नाराजी व्यक्त होत होती. तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. गुजरातच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधूनही येथे पर्यटक येत आहेत.
या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे.