शिवकॉलनी पुलानजीकचा प्रकार ; गस्तीवरील पोलिसांमुळे अनर्थ टळला ; जखमी चालक जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर ट्रान्सपोर्ट मालकाच्या मदतीने ट्रक घेवून रवाना
जळगाव – कलकत्त्याहुन टायरसाठी लागणार काला पावडर भरुन सुरतकडे जात असलेल्या ट्रकवर चालकाच्या दिशेने दगडफेक करुन ट्रक लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली. भिरकावलेल्या जोरदार दगड लागल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यालगतच्या झाडावर आदळून अपघात झाला. वेळीच गस्तीवर असलेल्या रामानंदनगर पोलिसांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला. अपघातग्रस्त ट्रकमधील जखमी रक्तबंबाळ अवस्थेतील चालकाला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर चालक जळगावातील ट्रान्सपोर्ट मालकाच्या मदतीने ट्रक घेवून सोमवारी दुपारी सुरतकडे रवाना झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
ट्रकचालक गोरख सिध्देश्वर जाधव वय 50 रा. बिहार हे यांनी कल्लकत्ता येथून ट्रक(क्र. डब्लू बी 23 डी 5082) मध्ये टायर करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरला जाणारा काळ्या पावडरचा माल भरला. हा माल त्यांना सुरत येथे पोहचवायचा होता. त्यासाठी ट्रक घेवून 6 मे रोजी कलकत्त्याहून सुरतकडे जाण्यासाठी रवाना झाला.
धावत्या ट्रकवर भिरकावला दगड
चालक जाधव हे ट्रक घेवून जळगावात पोहचले. महामार्गावरुन जात असताना रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास शिवकॉलनी पूलाजवळ त्याच्या धावत्या ट्रकवर कोणीतरी अचानक दगड भिरकावला. कॅबिनच्या दिशेने आलेला दगड थेट काचा फोडून आतमधील चालक जाधव यांच्यावर आला. जोरदार दगड तोंडावर बसल्याने गोंधळलेले चालक जाधव यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक थेट रस्त्यालगत काटेरी झाडा झुडपांवर आदळला.
पोलिसांनी केले जिल्हा रुग्णालयात दाखल
महामार्गावरील ट्रक अचानक रस्त्यालगत झाडांवर आदळल्याने अपघात झाला. याचवेळी या परिसरात रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस महेंद्र पाटील व रविंद्र पाटील हे वाहनासह गस्तीवर होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जाधव यांनी आपबीती पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांनी जोरदार दगड बसल्याने तसेच अपघातामुळे रक्तंबबाळ अवस्थेतील ट्रकचालक जाधव यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान दगड भिरकावणारे अज्ञात इसम पसार झाले होते.
चालकाला लुटण्याचा प्रयत्न की ट्रक लांबविण्याचा?
रामानंद नगर पोलिसांनी चालक जाधव यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर ट्रक जिल्हापेठ पोलीस ठाण्यासमोर उभा केला होता. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर जखमी चालक जाधव यांनी सकाळी जवळ असलेल्या संपर्क क्रमांकावरुन कलकत्ता येथील ट्रान्सपोर्ट मालकाला संपर्क केला. मालकाने जळगावातील ट्रान्सपोर्ट मालक हरजितसिंग यांना प्रकाराची माहिती दिली. हरजितसिंग यांनी सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातील चालक जखमी जाधव यांना सोबत घेत रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. नोंद झाल्यावर जिल्हापेठ परिसरात उभा ट्रक घेवून चालकाला सुरतकडे रवाना केले. ट्रकचालकाला लुटण्याच्या उद्देशाने अथवा ट्रक लांबविण्याचा उद्देशाने अज्ञात दरोडेखोरांनी ही दगडफेक केल्याची शक्यता हरजितसिंग यांनी बोलतांना व्यक्त केली आहे.