१२ दिवसांपासून स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही चोरीला; काँग्रेसची तक्रार !

0

रामटेक: नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमरेड विधानसभा मतदारसंघातील मतदार सुरक्षा केंद्रातून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मॉनिटर चोरीला गेली असल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. विशेष म्हणजे, हे साहित्य चोरी होऊन १२ दिवस झाले तरी पोलीस किंवा निवडणूक शाखेकडे अधिकृत तक्रार न केल्याबद्दल गजभिये यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

उमरेड विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रासाठी उमरेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तात्पुरते स्ट्राँग रुम तयार करण्यात आले होते. यात या मतदारसंघातील सर्व ईव्हीएम ठेवण्यात आले होत्या. याचा तपशील डीव्हीआरमध्ये होता व त्यावर सीसीटीव्हीची निगराणी होती. पोलीस बंदोबस्तही चोख होता. निवडणूक शाखेचे अधिकारी तेथे होते. असे असताना डीव्हीआर आणि मॉनिटर चोरी होणे धक्कादायक आहे. चोरी नंतर १२ दिवस याची वाच्यता तेथील सहायक निडवणूक अधिकाऱ्याने केली नाही. हे आश्चर्यकारक आहे. याबाबत सविस्तर तक्रार महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गजभिये यांनी केली आहे. केंद्रावर सीसीटीव्ही लावण्याचे काम स्थानिक एजंसीला देण्यात आले होते. माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान असणाऱ्यांनीच हे कृत्य केले अशल्याचा दावाही त्यांनी केला.