नवी दिल्ली: सात वर्षांपूर्वी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफद ईअर’चा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातून आलिया भट, वरूण धवन व सिद्धार्थ मल्होत्राने करियरला सुरुवात केली होती. आज तिघेही सुपरस्टार्स आहेत. आता करणचा दुसरा ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. अनन्या आणि तारा या दोघींचाही हा डेब्यू सिनेमा आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या प्रत्येक चित्रपटात दिसणारा सर्व मसाला यात आहे. मोठ-मोठे सेट, स्टाईलिश कपडे, प्रेमात गोंधळलेले तरूण…असे सगळे आहे. शिवाय टायगरची अॅक्शन आणि बेधडक डान्सही सोबतीला आहे. कॉलेजच्या कॅम्पसपासून ट्रेलरची सुरुवात होते. या ट्रेलरमध्ये मस्ती आहे, प्रेम आहे आणि वैर असे सगळे पाहायला मिळते आहे.
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट आधी २३ नोव्हेंबर २०१८ मध्ये रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे.
२०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईअर ’ हा चित्रपट रिलीज झाला होता. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातून आलिया, वरूण आणि सिद्धार्थ यांनी डेब्यू केला होता. हा चित्रपट तरूणाईने प्रचंड डोक्यावर घेतला होता. आता इतक्या वर्षांनंतर याच चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.