एसटीच्या संपामुळे जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास

नंदुरबार ( प्रतिनिधी )

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी बस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांनी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र नंदुरबार शहरात दिसत आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून एस टी बस सेवा बंद आहे. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात तर यावेच लागत आहे. बंद सेवा बंद असल्याने या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घेत जीव धोक्यात घालून गाव ते शहर ये जा करावी लागत आहे. खाजगी वाहनात हे विद्यार्थी कोंबून बसत आहेत, शिवाय टपावर बसून देखील प्रवास करत असल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे. अशावेळी अपघात देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पर्यायी वाहने उपलब्ध करून देण्यासाठी शासन अपयशी ठरले असल्याच्या प्रतिक्रिया पालकांमध्ये उमटत आहेत.