मालकाकडून पैसे घेतले अन् दोन दिवसांची घेतली होती सुट्टी ; आधारकार्डवरुन पटली ओळख
जळगाव- हॉटेलमालकाकडून कामाचे पैसे घेतले, यानंतर गावाला जायचे सांगून दोन दिवसाची सुट्टीही घेतली. यानंतर दुसर्या दिवशी हॉटेल कामगार सुरेश मंगा महाजन वय 45 रा. नशिराबाद यांनी असोदा रेल्वेगेटजवळ डाऊन रेल्वे लाईनवर आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. त्याच्या खिशातील पाकिटातील मिळालेल्या आधारकार्डवरुन त्यांची ओळख पटली.
शहरातील मूळ मेहरुण परिसरातील रहिवासी सुरेश महाजन हे काही वर्षापासून नशिराबाद येथे स्थायिक झाले आहेत. पत्नी, मुलगा व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मुलगा संजय अविवाहित असून तो एमआयडीसीत चटई कंपनीत कामाला आहे. कुटुंबांच्या उदरनिर्वाहात तो हातभार लावतो. सुरेश महाजन हे नशिराबाद येथील सोनी हॉटेलात कामाला आहेत.
कुटुंबियांकडून सुरु होता शोध
सुरेश महाजन शुक्रवारी सकाळी हॉटेलवर जात असल्याचे घरी सांगून निघाले. काही वेळाने सुरेश महाजन यांचा पुतण्या अतुल महाजन याने त्याच्या मित्रासमवेत हॉटेल गाठले. मात्र याठिकाणी त्यांनी बाहेरगावी जायचे सांगून दोन दिवसांची सुट्टी तसेच काही पैसे घेतले असल्याचे समजले. सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. सर्व जण घरी परतले. याचवेळी पोलीस कर्मचार्यांनी मृतदेहाजवळ मिळालेल्या आधारकार्डनुसार नशिराबाद गाठले. येथून अतुल महाजन व त्यांच्या नातेवाईकांनी असोदा रेल्वे गेट गाठले. यानंतर मयत सुरेश महाजन असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.मोबाईल, चार्जर व पाकिट अशा वस्तू मिळून आल्या आहेत. त्याच्या खिशातील पाकिटात काही पैसे होते, मात्र ते मिळून आलेले नाहीत तसेच त्यांच्याकडे नेहमी एक पिशवी असायची, तीही मिळाली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.